वैजापूर, (प्रतिनिधी): शहरात एका परप्रांतीय मजूर मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या टोळीचा वैजापूर पोलिसांनी अत्यंत कौशल्याने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावला आहे. बिहारमधून रोजगारासाठी आलेल्या एका १९ वर्षीय तरुणाला लुटून त्याची सुटका करणाऱ्या पोलिसांनी या प्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
अपहरणकर्त्यांनी इम्रानला ताब्यात ठेवल्यानंतर त्याच्याच मोबाईलवरून त्याच्या नातेवाईकांना फोन केला आणि १५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. या घटनेचे गांभीर्य ओळखून वैजापूर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. खंडणी मिळण्यास विलंब होत असल्याचे पाहून आरोपींनी इम्रानला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपींनी त्याच्याकडील २ हजार रुपये किमतीचा मोबाईल, ३०० रुपये रोख, ३ हजार रुपयांची चांदीची चैन आणि १ हजार रुपयांचे डिजिटल घड्याळ असा एकूण ६,३०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. अखेर रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास आरोपींनी इम्रानला कोपरगाव रोडवरील डावाळा फाटा येथे सोडून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांनी तीन विशेष तपास पथके तयार केली.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून इम्रानला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणले. पीडित मुलाच्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकांनी शहराचे प्रवेशद्वार आणि गुन्ह्याच्या मार्गावरील सुमारे ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज अत्यंत बारकाईने तपासले. पोलिसांनी सापळा रचून शिवम सुभाष सुरडकर (वय ३१ वर्ष, रा. बर्डी मस्जिद, वैजापूर) आणि सचिन बाळू गोरे (वय २९ वर्ष, रा. मसनखाई, वैजापूर) या दोन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त : त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त केली आहे. मात्र, या गुन्ह्यातील तिसरा साथीदार सचिन मुरलीधर पवार (रा. खंडोबा नगर, वैजापूर) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. या संपूर्ण कारवाईचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे करत आहेत. या यशस्वी कामगिरीत सपोनि विजय देशमुख, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, सायबर शाखेचे योगेश तरमाळे, अमोल कांबळे, अभिजित डहाळे, प्रशांत गिते, सचिन रत्नपारखे, उमेश जमदाडे, अजित नाचण आणि कैलास चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.












